रत्नागिरी : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना  डेंग्यू, अतिसाराची लागण झाली. दूषित पाण्यामुळे डेंग्यू, ताप, डोकेदुखी आणि अतिसाराची लागण ग्रामस्थांना झाल्याचे पुढे आले आहे. या सर्व रुग्णांवर दापोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दापोली तालुक्यातील हर्णे आणि पाजपंढरी ही गाव समुद्र किनारी वसलेली आहेत. या ठिकाणी मार्च महिण्यापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवते. दोन आठवड्यांतून एकदा पाणीपुरवठा या ठिकाणी होतो. त्यातच दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे रोगराई या ठिकाणी पसरली आहे.


अनेक रुग्णाना खासगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून आरोग्य यंत्रणेचे सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान, या दोन गावात मोठ्याप्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.