मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली. राज्यात सायबर संदर्भात ४९९ गुन्हे दाखल झाले असून २६१ व्यक्तींना अटक केली. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४९९ गुन्ह्यांची २३ जुन २०२० पर्यंत नोंद झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यानुसार गुन्ह्यांची नोंद


बीड ५२, पुणे ग्रामीण ४३, जळगाव ३४, मुंबई २९, नाशिक ग्रामीण १८, कोल्हापूर १७, सांगली १५, ठाणे शहर १५, बुलढाणा १५ , सातारा १४, जालना १३, नाशिक शहर १३, ठाणे ग्रामीण १३, नवी मुंबई १३, अहमदनगर १३, नांदेड १३, पालघर ११, लातूर ११,नागपूर शहर ११, परभणी ९, सिंधुदुर्ग ८, हिंगोली ८, अमरावती ८, पुणे शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, रत्नागिरी ४, सोलापूर शहर ४ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.


या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Tiktok विडिओ शेअर प्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube)गैरवापर केल्या प्रकरणी ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत २६१ आरोपींना अटक झाली असून यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
   
सध्याच्या काळात बऱ्याच व्हाट्सअॅप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. फ़ॉरवर्ड मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केलं आहे. सर्व व्हाट्सअँप ग्रुप अॅडमिन्स, ग्रुप निर्माते (owners) यांच्यावर विशेष जबाबदारी आहे कि, या कोरोना महामारीच्या काळात आपल्या व्हाट्सअॅप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगून सुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. 


ग्रुप settings काही काळाकरिता only admins करा. एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.