यवतमाळ : बहुचर्चित 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरूवात होत आहे. आज दुपारी 4 वाजता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शेतकरी महिलेला उद्घाटनाचा मान मिळण्याची संमेलन आयोजकांची विनंती महामंडळाने मान्य केली. दरम्यान संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्धाटन होणार होते. पण निमंत्रण पत्रिका वाटून झाल्यानंतर आयोजकांनी नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केले.  राज्यभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटत याचा निषेध करण्यात आला.  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या प्रकरणानंतर राजीनामा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आत्महत्यांचा दाखला देत किसान न्याय हक्क समितीने संम्मेलन उधळण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्धाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  गुरुवारी यवतमाळमध्ये झालेल्या बैठकीत महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी यासंदर्भातील घोषणा केली. तसेच डॉ.श्रीपाद जोशी यांचा राजीनामाही या बैठकीत मंजूर करण्यात आला. 



मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती


दुपारी 4 वाजता पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे या संमेलनाची सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण काही कारणांमुळे त्यांचा यवतमाळ दौरा रद्द झाला. पण उद्या शनिवारी ते संमेलनाला भेट देणार आहेत. आजच्या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  वैशाली येडे या संमेलनाचे उद्घाटन करतील. साहित्य संमेलन हे साधा पद्धतीत व्हावे असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांनी केले.