मुंबई / सातारा / चंद्रपूर / नाशिक : Rain in Maharashtra : आज राज्यात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, सातारा आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान चंद्रपुरात 11 हजार हेक्टरवरील पिकं पाण्यात तर नाशिकमध्ये भातशेती, भाजीपाला पिकांचं नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात पावसामुळे 99 जणांचा बळी गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांनी जीव गमावला आहे.


पुराच्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूरस्थिती निर्माण झाल्यानं नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुथडी वाहत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच महिन्याभरात 181 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी पुराच्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात आठ दिवसात 35 लोकांचा पावसामुळे बळी गेला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरं वाहून गेलीत. मृत व्यक्तींमध्ये 24 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर 9 जणांचा मृत्यू पुरात वाहून गेल्यामुळे झाला. 8 दिवसाच्या या मुसळधार पावसामुळे 60 हजार हेक्टर वरच्या पिकांना फटका बसला आहे.


समुद्राला मोठी भरती येणार


आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात तब्बल 4.51 ते 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या भरतीदरम्यान 50 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवाय भरतीदरम्यान नागरिकाना समु्द्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


पावसामुळे नऊ जण वाहून गेलेत


नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नऊ जण आतापर्यंत वाहून गेल्याची माहिती प्रशासनाकडे आलिय. आत्तापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा  वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे चांदवड, सुरगाणा आणि पेठ तालुक्यात 10 जनावरं दगावलीत. घरांच्या नुकसानीबाबात पंचनामे सुरू असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.


पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहतायत. जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणाचे पाच ही दरवाजे उघडण्यात आलेत.  धामणी आणि कवडास या दोन्ही धरणतून पाण्याचा विसर्ग सुरू असून  नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 


गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण 10 हजार नागरिकांचं स्थलांतर झाले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे असून पावसाच्या अधून-मधून सरी बरसतायत. वैनगंगा -गोदावरी आणि प्राणहिता नद्यांनी आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती आणलीय. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली आहे.