अंबरनाथमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी 8 दिवस माग काढत अखेर वाराणसीहून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने पत्नीशी वाद होऊन त्यातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा उलगडा यानंतर झाला आहे. यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे आणि त्याची पत्नी रूपाली लोंढे वास्तव्यास होते. त्यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. वर्षभरापूर्वी त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला होता. यानंतरच त्यांच्या सुखी संसारात वाद होण्यास सुरुवात झाली. रुपाली मुलीचा सांभाळ नीट करत नसल्यामुळे विकीचे तिच्याशी नेहमीच वाद होत होते. याच वादातून 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात मोठा वाद झाला. याच वादातून विकीने रूपालीचा पट्ट्याने गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. 


सुरुवातीला चारित्र्याच्या संशयातून हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेला होता. दुसरीकडे विकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली होती. 
 
विकी उत्तर प्रदेशात पळून गेला. त्याचा माग काढत असतानाच तो उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख, भागवत सौंदाणे, कैलास पादीर हे तिघे तातडीने वाराणसीला रवाना झाले. तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून या तिघांनी विकीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं. तिथून त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून गुरुवारी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान चौकशीत त्याने पत्नी मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.