`माझ्यासोबत चल`, प्रभादेवी स्थानकावर सर्वांसमोर महिलेशी छेडछाड; रेल्वेने दिलं उत्तर
मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावर एका महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भरगर्दीत त्याने महिलेचा हात पकडत `माझ्यासह चल` असं म्हटलं.
मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावर एका महिलेची छेड काढण्यात आली. स्थानकावर गर्दी असतानाच व्यक्तीने महिलेचा हात पकडला. पीडित महिला बेंचवर बसलेली असताना आरोपी तिच्या शेजारी बसला होता. यावेळी त्याने आक्षेपार्ह कमेंट्स करत तिचा हात ओढला. यानंतर त्याने तिला माझ्यासोबत चल असं म्हटलं. एका दक्ष नागरिकाने हा सगळा प्रकार एक्सवर शेअर केला आहे. यानंतर रेल्वेनेही या पोस्टवर उत्तर दिलं आहे.
आरोपीच्या या कृत्यामुळे महिला घाबरली आणि ती बेंचवरुन उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसली. यानंतरही आरोपी तिच्यावर कमेंट करत होता. यावेळी त्याने तिला म्हटलं की, "नंतर तू बोलू नकोस".
यानंतर नागरिकाने त्या महिलेला तुम्ही त्याला ओळखता का अशी विचारणा केली. यावर तिने आपण त्याला ओळखत नाही असं सांगितलं. रात्री 9.15 वाजता हा सगळा प्रकार घडला. महिला प्रभादेवी स्थानकावर विरारच्या दिशेला असणाऱ्या बेंचवर बसली होती.
नागरिकाने एक्सवर आरोपीचे फोटो काढत सगळा घटनाक्रम सांगितला आहे. यावेळी त्याने रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी टॅग केलं आहे. ही घटना गांभीर्याने घ्यावी आणि सुरक्षेत वाढ करावी अशी मागणीही त्याने केली आहे. महिला नंतर तेथून निघून गेल्याने मी हेल्पलाइनला फोन केला नाही असंही त्याने सांगितलं आहे. अशा घटना टाळण्यासाठी स्थानकांवर सुरक्षा वाढवावी असं आवाहन त्याने केलं आहे.
आरपीएफने घेतली दखल
आरपीएफने या तक्रारीची दखल घेतली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी साध्या कपड्यातील कर्मचारी स्थानकावर तैनात असतात अशी माहिती त्यांनी दिली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी 200 एमएसएफ तैनात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
"तुमची तक्रार रेल्वेने गांभीर्याने घेतली असून, काळजी आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नियमन करण्यासाठी पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे 200 एमएसएफ कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सेवेत समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यांना सतर्क राहून अशा गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे," अशी माहिती रेल्वेने दिली आहे.