ठाण्यात (Thane) बापानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निर्दयी बापाने कागदापासून एक गोळा तयार करत तो मुलाच्या तोंडात कोंबला.  आरोपी बाप दारुच्या नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी-मंगळवारच्या रात्री ही घटना घडली. घटना घडली तेव्हा आरोपी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता असं पोलिसांनी सांगितलं. या हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. आरोपी आणि त्याची पत्नी दोघेही वेगळे राहत होते. सतत वाद होत असल्याने दोघेही विभक्त राहत होते. दरम्यान मुलगा आपल्या आईसह राहत होता असं पोलीस कंट्रोल रुमने सांगितलं आहे. 


सोमवारी मुलगा आपल्या घऱातून बेपत्ता झाला होता. यानंतर कुटुंबाने त्याचा शोध सुरु केला होता. मंगळवारी सकाळी 8 वाजता मुलगा आपल्या वडिलांच्या घरी मृतावस्थेत सापडला असं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुलाचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या तोंडात कागदाचा गोळा कोंबण्यात आला होता. तसंच नाकातून रक्त वाहत होतं. 


तपासादरम्यान पोलिलांना माहिती मिळाली की, पत्नीपासून वेगळं राहू लागल्यानंतर आरोपी मद्याच्या आहारी गेला होता. तो प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करु लागला होता असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. गुन्ह्याच्या रात्रीही त्याने मद्यपान केलं होतं. याच अवस्थेत त्याने कागदाचा गोळा तयार केला आणि मुलाच्या तोंडात कोंबला. श्वास गुदमरल्यामुळे अखेर मुलाला आपला जीव गमवावा लागला. 


मुलाच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.