कंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी
Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
नवी मुंबई, स्वाती नाईक, झी मीडिया : नवी मुंबईत एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण अपघात (accident of Shivshahi bus) झाला आहे. या अपघातात बस मधील एक प्रवासी ठार झाला आहे. तर, 22 प्रवासी जखमी झाले आहेत. ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात बस असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.
मुंबई गोवा हायवेवर नवी मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या कर्नाळा खिंडीत शिवशाहीची ही बस अपघात ग्रस्त झाली आहे. MH 09 EM 9282 या पनवेल-महाड बसला दुसारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला. पनवेलकडून ही बस महाडच्या दिशेने निघाली होती. यावेळी बस चालक ओव्हर स्पीडमध्ये बस चालवत होता. यावेळी अति वेगात असलेली बस ड्रायव्हरला कंट्रोल करता आली नाही. कर्नाळा खिंडीत बस अनियंत्रीत होऊन रस्त्यावर पलटी झाली. बसमधून 38 प्रवासी प्रवास करत होते.
कर्नाळा खिंडीत बस पोचली असता टर्निंगला ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट रस्ता सोडून खाली नाल्यात जावून आदळली. यामुळे बसने पल्टी खाल्याने प्रवाशांना जबरदस्त दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, एका प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना पनवेल उप जिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटली
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहेत. यात 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 50 ते 60 जण प्रवस करीत होते. ही बस मुंबईहून तेलंगणाला निघाली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तातडीने दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजुला करत महामार्गांवरिल वाहतूक सुरळीत केली. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.