कॅन्सरग्रस्तांसाठी चिमुरड्या आदितीचं `केसदान`
आदिती अस्वस्थ झाली, तिला प्रचंड वाईट वाटलं आणि तिनं एक वेगळाच विचार केला.
कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : आदिती जैन या लहानग्या मुलीनं भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारी आदिती इयत्ता पाचवीत शिकते. आदिती इतर मुलींप्रमाणेच भरपूर अभ्यासही करते आणि तेवढीच मस्तीही करते. एक दिवस आदिती आपल्या आई वडीलांसह एका कॅन्सर रुग्णाला भेटायला गेली होती. तेव्हा त्या ठिकाणी पाहिलेली दृश्य तिचं मनं हेलावणारी होती. कॅन्सरशी लढणारे अनेक पेशंट तिने पहिल्यांदाच पाहिले. यावेळी रुग्णाच्या डोक्यावर केस नसल्याचं तिच्या पाहण्यात आलं. आदिती अस्वस्थ झाली, तिला प्रचंड वाईट वाटलं आणि तिनं एक वेगळाच विचार केला.
'छोटी समाजसुधारक'
अदितीनं तिचे लांब सडक केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान करायचे ठरवले.
मुंबईतल्या मदत या संस्थेला आदितीनं केस दान केले. आदितीच्या या संवेदनशीलपणाचं तिच्या आई वडिलांना कौतुक आहे.
तिच्या आजूबाजूची मंडळी आता तिला 'छोटी समाजसुधारक' म्हणून ओळखतात.
संवेदना बोथट होत चालल्याची ओरड सध्या ऐकायला मिळत असताना चिमुरड्या आदितीला झालेली ही जाणीव आणि त्यासाठी तिनं केलेलं काम ही नक्कीच 'आशा उद्याची' म्हणाव लागेलं.