शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने, दोन गटात धक्काबुक्की
शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला.
औरंगाबाद : सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर नेते आमने सामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. 'झी २४ तास'च्या 'दे दणा दण' कार्यक्रमात सत्तार आणि भाजप बंडखोर या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
शिवसेना आणि बंडखोर भाजप नेते यांच्यातील राड्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले. सिल्लोडमधून सत्तार हे शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार आहेत. दरम्यान, सत्तार यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध झाला आहे. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे बंडखोर सुनील मीरकर यांच्यात वाद उफाळळा आहे.
अब्दुल सत्तार यांचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, या मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी झाली आहे. बंडखोर मीरकर यांनी सत्तार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सत्तारांच्या विरोधात भाजप नेते दिसून येत आहेत. शिवसेनेने तिकीट दिले म्हणून भाजप नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.