आरोपीनंच उघडली बंद झालेली फाईल!
गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी कुठली तरी एक चुक करतो आणि गजाआड होतोच
प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी कुठली तरी एक चुक करतो आणि गजाआड होतोच हे वाक्य पुन्हा एकदा संगमनेरमध्ये खरं ठरलय. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
नऊ वर्षापूर्वी झालेला एक खून, ना आरोपींचा थांगपत्ता ना पुराव्यांचा कुठलाही मागमूस. पण तरीही दारुच्या नशेत मित्रांसमोर गुन्ह्याची वाच्यता केली, याच सुगाव्यावर पोलीसांची तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी गजाआड झाला.
नऊ वर्षापूर्वीच्या खूनाला अखेर वाच्यता फुटलीय. पुणे हडपसर येथे बारावीत शिकणाऱ्या अर्चना सोनवणे हीचे आणि आरोपी प्रतिक धरणे यांचे प्रेमसंबध होते. ते अधिकच दृढ झाल्याने, तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, आरोपीला अर्चनाचा हा जाच व्हायला लागला आणि आरोपीने अर्चनाचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.
यानंतर अर्चनाचा मृतदेह चंदनापुरी घाटातील खोल दरीत फेकला. अर्चनाचा मृतदेह आढळल्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात ९ जानेवारी २००८ रोजी नोंदवला गेला. मात्र, यांचा तपास न लागल्याने कागदपत्रे अंतिम मंजूरीसाठी न्यायालयात पाठविण्यात आले.
या घटनेनंतर तब्बल नऊ वर्षांनी यापैकी एका आरोपीने नाशिक येथे मद्याच्या धुंदीत नऊ वर्षांपूर्वी केलेल्या या गुन्ह्याची फुशारकी मित्रासमोर मारली आणि फसला. याच माहितीच्या आधारे, नाशिक पोलिसांच्या मदतीने विनित झाल्टे, प्रतीक धरणे आणि त्यांचा साथीदार चंद्रकांत माधवराव पिंपळीस्कर या तिघांना ताब्यात घेतलं.
अर्चनाच्या वडीलांचा २०१२ साली मृत्यू झाल्यापासून घरच्यांनीही तीचा शोध घेणं थांबवलं होतं. पण, आरोपीचं दारुच्या नशेत बरळल्यामुळे सोनवणे कुटुंबियांना अर्चनाच्या मारेक-यांचा शोध लागलाय.
आरोपी गजाआड झाल्याने अर्चनाच्या खूनाला वाचा फुटलीय. पण या निमित्ताने गुन्हेगार किधीही पोलिसांपासून लपू शकत नाही हेच सिद्ध झालयं.