दुष्काळग्रस्त भागात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, नदीचं रौद्र रूप आणि पूल गेला वाहून
अतिवृष्टीने नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
विष्णु बरगे, झी मीडिया, बीड : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्येही अतिवृष्टीने नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच बीडमध्ये दोन तासांच्या पावसातच नदीवर बांधण्यात आलेला पुल वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी तलाव ते आर्धामसला, काजळवाडी, रुई, टाकळी या शिवारातून वाहत जात सिंदफनाला येऊन मिळणाऱ्या उपनदीने शनिवारी झालेल्या पावसामुळे चांगलेच रौद्र रूप धारण केले आहे. या पुरामुळे चक्क नदीवरील पुल वाहून गेला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
बीड तालुक्यातील चौसाळा, बोरखेड, अंधापुरी घाट, पिंपळनेर, नाथापुर, घाटसावळी, परभणी केसापुरी आदी गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेवराई तालुक्यातील काजळवाडी या गावा शेजारील सिंदफना नदीच्या उपनदीला पूर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यातही प्रचंड नुकसान
मराठवाड्यात अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान केलं आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास 742 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आता नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मदत करतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे. रविवारी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयात याबाबत आढावा बैठक होणार आहे. बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे विभागातील खरीप पीक नुकसानीसह बाधित झालेल्या पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करणार आहेत.
विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना वीजांच्या कडकटासह पावसाचा इशारा दिला आहे.