Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पोलिसांकडून (Ahmednagar Police) कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने ही माहिती समोर आणली आहे. दरम्यान, याप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत गाडीवरुन जात असताना तीन अज्ञानातांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडी थांबवली आणि काहीच न बोलता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. हेरंब कुलकर्णी यांना त्या अज्ञातांनी रॉडने मारहाण केली. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळात हल्लेखोर तिथून निघून गेले.  या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर चार टाके पडले आहेत.


कुलकर्णी हे येथील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हेमंत कुलकर्णी व त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी दुचाकी वाहनावरुन घरी जात होते. त्यावेळी नगर शहरातील रासनेनगर परिसरात  दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर रॉडने हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली. सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांपासून हेरंब कुलकर्णी यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. जमाव जमल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.


पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी 12.18 मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. "आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले होते. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही सीसीटीव्ही फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे," असे प्रतिमा कुलकर्णी म्हणाल्या.