कुणाल जमदाडे, झी मीडिया, कोपरगाव : गेल्या काही दिवसांपासून तरुणांप्रमाणेच लहान मुलांमध्येही हृदयविकाराच्या (Heart Attack) घडनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. शाळकरी मुलांना देखील हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आलं आहे. असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात घडला आहे. पतंगाच्या पाठीमागे धावताना एका विद्यार्थ्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कोपरगावात खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलाच्या आकस्मित निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेत असलेला साहिल भाऊसाहेब गांगुर्डे नेहमीप्रमाणे  मंगळवारी शाळेत आला होता. विद्यार्थ्यांबरोबर त्याने खेळ तसेच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शाळा सुट्टीच्या वेळेस अभ्यास देखील केला. मंगळवारची शाळा सुटण्याची घंटा झाली आणि साहिल घरी निघाला. घरी पोहोचल्यानंतर गावातील आठवडा बाजार असल्याने आई-वडिलांनी साहिलला मिठाई आणली होती. 


साहिलने मिठाईचे दोन घास खाल्ले आणि घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांच्या मागे धावला. एक पतंगाचा मांजा तुटल्याने तो पकडण्यासाठी साहिल गांगुर्डे त्याच्या मागे धावत सुटला. तुटलेला पतंग त्याने पकडला मात्र खूप जोरात धावल्याने त्याला धाप लागली. वडील भाऊसाहेब गांगुर्डे आई सोनाली गांगुर्डे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला कोपरगाव येथे दाखल करण्यास सांगितले. मात्र अतिशय जोरात धावल्याने त्याचा श्वासोश्वास बंद झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिवसभर शाळेत बागडणाऱ्या मुलाचा असा करून अंत झाल्याने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली.