Maharashtra CM Oath Ceremony: आज राज्यात सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आझाद मैदानात आज महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा पार पडला. देशभरातील दिग्गज या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा, जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी विविध खाती सांभाळली आहेत. त्यांनी राज्य, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा 1991 साली लोकसभा लढवली. पहिल्याच निवडणूकीत ते बारामतीतून थेट लोकसभेत निवडून गेले.  तीन चार महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर 1991 सालीच ते बारामतीतून आमदार म्हणून उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या चढले. त्यानंतर गेली 33 वर्षाहून अधिक काळ ते आमदार आहेत. 


अजित पवार यांनी बीकॉममध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अजित पवार आतापर्यंत सहाव्यांदा आमदार म्हणून बारामतीतून निवडून आले आहेत. या काळात त्यांनी अनेक खाती भूषवली. अजित पवारांनी 10 नोव्हेंबर 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. 25 सप्टेंबर 2012 पर्यंते ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 तेव्हाही त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 


काही तासांचे उपमुख्यमंत्री 


2019च्या निवडणुकांनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार 80 तासांत कोसळलं होतं. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात उपमुख्यमंत्री होते. मात्र हे सरकार कोसळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत ते ठाकरे सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री होते. 


अजित पवारांची संपत्ती किती?


अजित पवार यांनी निवडणूक आयोगांकडे या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शपथपत्र दाखल केले. त्यांच्याकडे एकूम 7 लाख 20 हजारांची रोख रक्कम आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार 400 रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे बँकेत 3 कोटी 9 लाख 69 हजार 400 रुपयांची ठेव तर पत्नीच्या नावे 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपयांच्या ठेवी आहेत. अजितदादांकडे 24 लाख 79 हजार 760 रुपयांचे बाँड्स आहेत. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 14 लाख 99 हजार 610 रुपयांचे बाँड्स आहेत.


अजित पवारांचा कार्यकाळ


लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991


विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019, 2019 ते 2024


अजित पवारांनी सांभाळलेली खाती


कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992


पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993


पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004


ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004


जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता :  नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009


जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010


उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012


उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014


उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019


उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 


विरोधी पक्षनेते : 4 जुलै 2022 ते 30 जून 2023 


उपमुख्यमंत्री : 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024