पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार वेळेचे किती पक्के आहेत, याचे वेगवेगळे किस्से आपण अनेकदा ऐकले आहेत. त्याचाच प्रत्यय पुण्यात मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोकडून सुरू आहे. यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती अजित पवार यांनी घेतली. त्यासाठी ते सकाळी सहा वाजता फुगेवाडी स्टेशनवर पोहोचले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार येणार म्हटल्यावर महा मेट्रोचे अधिकारीदेखील झाडून उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, त्यात काही अडचणी आहेत का ते जाणून घेतले. लॉकडाऊनमुळे हे काम अनेक महिने ठप्प होते. सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही. असं असताना या कामाला गती कशी देता येईल याविषयीची चर्चा अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. 



प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोची तिकीट विक्री तसेच इतर बाबी कशा पद्धतीने कार्यान्वित होतील याची माहिती अजित पवार यांनी घेतली. मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्यामध्ये अजित पवार कोरोना विषयीं आढावा बैठक घेणार आहेत.