Maharashtra Day 2023: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन आज आपण सर्वच जण साजरा करत आहोत. आज राज्यात त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यात आला. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी थोड्याच वेळात मुंबईत हुतात्मा स्मारकावर अभिवादन करणार आहेत. शासकीय पातळीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारने काही घोषणाही केल्या आहेत. आजपासून मुंबई मेट्रो प्रवासात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांगांना २५ टक्के सूट देण्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मध्यरात्री हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना वंदन केलं. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या १०६ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना मध्यरात्री ठाकरे पितापुत्रांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासह ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत खास पोस्ट केली आहे.


राज्यातील जनतेला 'महाराष्ट्र दिना'च्या मनापासून शुभेच्छा देतो. यासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या १०६ वीरांना अभिवादन करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान देणाऱ्या समस्त महाराष्ट्र वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणतात.


संपूर्ण जगाची चाकं कामगारांच्या श्रमशक्तीवरंच फिरत असतात. कामगारांच्या घामावरंच जगाचा रहाटगाडा सुरु असतो. कामगार दिनाच्या निमित्तानं मी जगभरातील कामगारांना, त्यांच्या श्रमशक्तीला वंदन करतो.कामगार बंधु-भगिनींना, त्यांच्या कुटुंबियांना आजच्या कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक ८१४ गावं महाराष्ट्रात सामील करण्याचं आपलं स्वप्न आजही अपूर्ण असून ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा आपला लढा कायम राहील, असा निर्धार व्यक्त करतो,  असंही अजित पवार म्हणतात.


शेती,उद्योग,व्यापार,शिक्षण,विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन ,आरोग्य,कला,क्रीडा,सहकार अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच अव्वल राहिली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक सुधारणा अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ज्यांच्या विचारांवर चालतो, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनाही वंदन करतो, अशी पोस्ट अजित पवार यांनी केलीये.


आणखी वाचा - Brij Bhushan Singh: '...तरच मी राजीनामा देईन'; मोदींचं नाव घेत बृजभूषण सिंह हे काय म्हणाले!!


महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या शेतकरी, कष्टकरी, साहित्यिक, कलावंत, खेळाडू, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांच्या कष्टातून महाराष्ट्र घडला, वाढला, समृद्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या या सुपुत्रांबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया. देशाची एकता, समता, बंधुता, सार्वभौमत्वाची भावना कायम ठेवूया. देशाची लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊया, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलंय.