Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
Ajit Pawar : अजित पवार यांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भातील चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. अजितदादा यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे भाष्य त्यांनी केले होते. त्यानंतर आता भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलेय, अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झालीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाबांच्या काळात आपण खूश नव्हतो. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना आपण आनंदी होतो, असे वक्तव्य अजितदादा यांनी केले होते.
राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार!
तर दुसरीकडे अजित पवारांबाबतच्या चर्चांवर खुद्द अजित पवार आणि त्यानंतर भाजपनेही स्पष्टीकरण दिले. मात्र तरीही या चर्चा थांबताना दिसत नाहीत. कारण राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार, असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रवादीच्याच माजी मंत्र्यांनी केला आहे. निवडणुकीआधी राज्यात भाजप काहीतरी चमत्कार करेल, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी केले आहे. तेव्हा अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही राज्याच्या राजकारणात काहीतरी शिजतंय अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
ते बहुमताच्या बाजूने आल्यास मुख्यमंत्री - दानवे
अजित पवार धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते बहुमताच्या बाजूने आल्यास राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याने पुन्हा भुवया उंचावल्या आहेत. त्याचेवळी अजित पवारांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.
काँग्रेसची सावध भूमिका
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत मविआच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांची क्षमता आहे, असं राऊत म्हणाले. तर 145चा आकडा असेल तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पुण्यात मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स
दरम्यान, पुण्याच्या कोथरुड, पौड रोड भागात लागलेल्या बॅनर्सनी सध्या लक्ष वेधून घेतल आहे. अजित पवारा यांचा फोटो लावून त्यावर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असा मजूकर लिहिण्यात आलाय. पुणे मनपा निवडणुकीतील इच्छुकांनी अजित पवारांनी नावाखाली स्वतःची प्रसिद्धी सुरु केली आहे.