पुणे: सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला का केला? तरुणाने अखेर सांगितलं सत्य, म्हणतो `मला मारायचं नव्हतं, पण...`
Pune Murder: पुण्यातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने आपण हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.
Pune Murder: पुण्यातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या (Yerwala Police Station) हद्दीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, तिच्यावर हल्ला करणारा तिचा कंपनीतील सहकारी होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान चौकशीत त्याने हल्ल्यामागील कारण सांगितलं आहे.
कृष्णा सत्यनारायण कनोजा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून शुभदाने आपला विश्वासघात केला होता असा त्याचा दावा आहे. शुभदाला मारायचं नव्हतं, पण अद्दल घडवायची होती असंही त्याने म्हटलं आहे. विश्वासघाताचा राग मनात ठेवत कृष्णाने शुभदावर हल्ला केला होता. वडील आजारी आहेत असं सांगत शुभदाने वेळोवेळी कृष्णाकडून पैसे मागितले होते. मात्र जेव्हा तिच्या वडिलांना कुठलाही आजार नसल्याचं लक्षात आल्यावर कृष्णाने तिला अद्दल घडवायचे ठरवलं होतं.
VIDEO: नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांकडून गांजा तस्कराचा पाठलाग, एका कारच्या मागे धावत होत्या 8 CR व्हॅन्स; डिक्की उघडली असता....
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते. शुभदाने वडील आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगून कृष्णाकडून कधी 25 हजार तर कधी 50 हजार असे एकूण 4 लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता शुभदा आणखी पैसे मागू लागल्याने कृष्णाचा संशय बळावला होता.
कृष्णाने थेट शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाला धक्का बसला. कारण तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याला कुठलाही आजार नाही किंवा शस्त्रक्रिया झालेली नाही असं सांगितलं. सत्य समोर आल्यानंतर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. यातून त्यांच्यात अनेक वेळा वादावादी झाली.
सोमवारी कृष्णाने शुभदाला अद्दल घडावी हा मानस ठेवत थेट कंपनीच्या पार्किंग गाठलं आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदाच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचेंरक्त गोठलं जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला.