Ghatkopar Railway Crime News : मेट्रो कनेक्टीव्हीटी असल्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशातच घाटकोपर रेल्वे स्थानकात एक भयानक घटना घडली आहे. नग्न अवस्थेत एक व्यक्ती कल्याण लोकलच्या महिला डब्यात चढला यामुळे एकच खळबळ उडाली.तात्काळ रेल्वे पोलिसांची मदत न मिळाल्याने महिलांमध्ये घबराहट पसरली होती. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. सायंकाळी चारच्या सुमारास नग्न अवस्थेमध्ये एक मनोरुग्ण व्यक्ती सीएसटी - कल्याण एसी लोकलमध्ये घाटकोपर स्थानकात महिला डब्यामध्ये चढला. या व्यक्तीला पाहून महिला भयभित झाल्या. महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. महिलांनी या व्यक्तीला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती ट्रेनमधून उतरत नव्हता. अखेर महिलांनी आरडा ओरड केल्यानंतर लोकलमध्ये असलेल्या टीसीने या व्यक्तीला  प्लॅटफॉर्मवर उतरवले.


मात्र, या घटनेमुळे महिलांचा सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नग्न व्यक्ती रेल्वे स्थानकावर थांबलेला असताना त्याला कुणी पाहिले नाही का?  दिवसाढवळ्या असा प्रकार होत असल्याने आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस करतात तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.


मुंबईत मध्य रेल्वेच्या वाशिंद - खडावली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची भोसकून हत्या झाल्याची घटना घडली होती. नशेबाज तरूणांनी लोकलमध्ये प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी दत्तात्रय भोईर यांनी त्यांना अडवलं. त्यावर त्यांनी भोईर यांच्यावर चाकूनं वार केले. उपचारादरम्यान भोईर यांचा मृत्यू झाला.


कल्याण टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान एका वृद्धाची प्रवासा दरम्यान हत्या करण्यात आली होती. बबन हांडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किरकोळ वादातून आरोपी सुनील भालेराव यांनी वृध्दाला बेदम मारहाण केली. यात त्यांचा लोकल मध्येच मृत्यू झाला. या हत्ये प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सुनील भालेराव याला अटक केलीय.