उस्मानाबाद : राज्याचे जलसंवर्धन मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गेल्या शुक्रवारी गोळीबार झाला होता. या गोळीबारात त्यांच्या पोटात गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल राजळे यांच्यावर झालेला हल्ला हा आपल्यावरच झालेला हल्ला आहे अशी प्रतिक्रिया शंकराव गडाख यांनी दिली होती. हा हल्ला राजकीय द्वेषातून झाल्याचेही गडाख यांनी म्हटले.


त्यानंतर एक वादग्रस्त ऑडिओ क्लीप समोर आली. शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांना जीवे मारण्याचा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. गडाख आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्यासाठी २० विदेशी पिस्तूल खरेदी करण्यात आल्याचेही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. या ऑडीओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. 


या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून राहुल राजळेंवरील हल्ल्याचा आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा संबध आहे का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. याबरोबरच शंकरराव गडाख यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.


सदर ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने तपास सुरु असताना पोलिसांनी मंत्री गडाख यांचे पीए राजीव राजळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. शेवगाव बस स्थानकावरून पोलिसांनी नितीन शिरसाठ या युवकाला ताब्यात घेतले असून त्याची पोलीस चौकशी सुरु आहे.