विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याचं प्रमाण अधिक आहे. पाणी साचू नये म्हणून विविध प्रकारच्या गोष्टींचा प्रयोग केला जातो. मात्र सगळ्या गोष्टी सपशेल फेल ठरतायेत. मात्र औरंगाबादच्या आनंद कुलकर्णी यांनी या समस्यावर तोडगा काढला आहे. हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाऊस लिफ्टिंग म्हणजे काय?


हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर घर थेट हवेत उचलण्यात होतो. हाऊस लिफ्टिंगच्या सहाय्याने आनंद कुलकर्णी यांनी 2 हजार फुटांचा बंगला वर उचलून पावसाच्या पाण्यातून मुक्ती मिळवली आहे. 


हाऊस लिफ्टिंगचा प्रयोग कसा केला जातो? 


घराला उचलण्यापूर्वी घराच्या भिंतींच्या बाजूने दोन - दोन फूट खोदकाम करतात. बिम लागले की मग जॅक लावला जातो. गाडीला जॅक लावल्यावर ज्या प्रमाणे उचलले जाते, त्याचप्रमाणे घरालाही उचलले जाते. पिलरच्या घरांना आणि लोडबेअरिंगच्या घरांनाही हे शक्य आहे. परदेशात या पद्धतीचा वापर अनेक वर्षापासून केला जातोय.
 
आनंद कुलकर्णी आणि त्यांची सक्सेस स्टोरी?


आनंद कुलकर्णी हे एका खाजगी कंपनीत लेखाधिकाऱ्याचे काम करतात. त्यांनी 2011 मध्ये 2 हजार चौरस फुटांवर एक घर बांधलं. कालांतराने बाजूच्या गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला त्यामुळं पावसाळ्यात दरवर्षी घरासमोर पाणी त्या गल्लीतून वाहून यायचे आणि घरासमोर तुंबायचे इतकंच नाही तर अनेकदा पाऊस जास्त असला की ते पाणी घरातही शिरायचे. मात्र अनेक उपाय केल्यानंतरही यश मिळत नव्हते. 


इंटरनेटच्या माध्यमातून आनंद यांना हाऊस लिफ्टींगचा पर्याय सापडला. हाऊस लिफ्टिंगच्या सहाय्याने  घर एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जाते. कुलकर्णी यांनी हरियाणातील एक कंपनीच्या मदतीने 5 मे ला काम हाती घेतले आणि आता हे काम पुर्ण झाले आहे. मराठवाड्यातील हाऊस लिफ्टींगचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे.  नविन घर बांधायचे तर प्रतिचौरस फूट खर्च हा दीड हजारांच्या वर आहे. मात्र घर लिफ्टींगसाठी प्रतिचौरस फुट खर्च अवघा 230 रुपये आला आहे. त्यामुळे कोणालाही कमी खर्चात कुलकर्णी यांचा तोडगा वापरता येणार आहे.