Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case:  बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी हा शाळेतील सफाई कर्मचारी असून त्याला अटक करण्यात आल्यानंतरही पालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून झाल्याचा आरोप केला जात आहे. सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याचसाठी आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर शहरातील रिक्षाही आज बंद असून संतप्त बदलापूरकर प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरत रेल रोको केला. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. बदलापूरमधील हे आंदोलन सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


काय म्हणाले फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे", अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. "या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत," असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच सदर प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव माडण्याचे आदेश दिले जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली. "हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत," असं फडणवीस म्हणाले.


मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न


दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सांगत कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. बदलापूरमधील घटनेची सखोर चौकशी केली जाईल. तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही यासाठी कठोर नियमावली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये शिक्षक, पोलीस किंवा इतर कोणाही असलं तरी त्यांची पाठराखण केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. बदलापूरसारख्या घटना फार दूर्देवी असून त्या परत घडणार नाहीत यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी प्रशासन म्हणून आमच्याकडून केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


नक्की वाचा >> Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?


असे गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठीही काम केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. आपण बदलापूरमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.