श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर: वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे इतर धर्मांबद्दल तिरस्कार करता कामा नये, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. प्रतिभाताई यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने नागरिक सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री व शरद पवार यांचे कौतुक करून प्रतिभाताई यांनी विदर्भाचा जलद आणि सर्वंकष विकास व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केली. लेकीबाळींचा सन्मान करण्याची संस्कृती महाराष्ट्राची आहे. तेच थोरपण बाळासाहेबांनी मला राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देऊन सिद्ध केले, असे त्यांनी सांगितले. 


आपल्या पदाचा देशाला व महाराष्ट्राला कसा उपयोग होईल याचा मी सातत्याने विचार केला. प्रामाणिकपणे आणि सन्मानाने राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडली. प्रतिभाताईंना आपण पाच वर्ष ज्युनिअर आहोत. मात्र, आपण मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले, असे शरद पवार यांनी म्हटले.



प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जींसाठी पाठिंबा मिळविण्याकरिता आपण मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटलो होतो. ते एनडीएचे सदस्य असताही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. आज त्यांच्या सत्काराला बाळासाहेबांचे सुपूत्र मुख्यमंत्री म्हणून उपस्थित आहेत, हा योगायोग म्हणावा लागेल, असे पवारांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दोनवेळा पवार साहेबांचे ऐकले. तर मी का नाही ऐकणार, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.