Barsu Refinery Project Against Protest : प्रणव पोळेकर / प्रताप नाईक : राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरुच आहे. मात्र आता पोलीस यंत्रणा आक्रमक झाली आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात बळाचा वापर करुन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यासोबत आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत. यावेळी गवताला आग लावण्यात आली होती. पोलीस ही आग विझवताना दिसत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते बारसूच्या सड्यावर गेले होते. तिथं त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आजही रिफायनरी विरोधात आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चासाठी मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमले आहेत. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


महिला अधिक आक्रमक 


बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आमचा जीव गेला तरी आम्ही हलणार नाही, असा निर्धार आंदोलन करणाऱ्या महिलांनी केला आहे. पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला आहे. आंदोलनकांची धरपकड करण्यात येत आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Barsu Refinery : उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून


रिफायनरी विरोधकांचा आज मोर्चा निघण्याची तयारी सुरु होती. त्याचवेळी राऊत यांना ताब्यात घेतले. बारसूच्या माळरानावर आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. 



ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा


तसेच रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रिफायनरी विरोधक गनिमी काव्यांना आंदोलन करण्याची शक्यता आहे. रिफायनरीबाबत शिंदे-फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी खासदार विनायक राऊतांनी केली आहे.


बारसूतल्या स्थानिक लोकांना विश्वास घ्यायचं म्हणजे नक्की कसं, असा सवाल आज खासदार संजय राऊत यांनी पवारांना विचारला. बारसूत सरकारने तातडीने सर्वेक्षण आणि भूसंपादन मागे घ्यावं, अशी मागणी ठाकरे गटातर्फे संजय राऊत यांनी मांडली. मात्र आता राऊत हे ठाकरेंचे राहिले नाहीत आणि पवारांचेही राहिले नाहीत असा टोला आमदार नितेश राणे यांनी मारला.


बारसू परिसरातल्या अनेक जमिनी या राजकारणींच्या असून त्यांची नावं जाहीर करा, अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. मात्र अशी मागणी करुन राऊत उद्धव ठाकरेंनाच अडचणीत आणत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.