Barsu Refinery Project: कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. स्थानिकांच्या आंदोलनात आता शिवसेना ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दिला आहेत. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसूला जाणार आहे. दरम्यान, आज स्थानिकांचा महामोर्चा निघणार आहे. दुसरीकडे भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्प उभारणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार आहेत. बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तर सरकारने पोलिसांच्या छावण्या दूर करुन लोकांशी चर्चा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
बारसूतल्या रिफायनरीचा वाद चांगलाच पेटला आहे. एकीकडे बारसूत स्थानिकांनी ठिय्या दिला असताना दुसरीकडे काही आंदोलकांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आपण स्थानिकासोबत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना दिले होते. आता ठाकरेच आंदोलन ठिकाणी जाणार असल्याने ते पुढील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रश्नावर जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, रिफायनरी विरोधक, रिफायनरी समर्थक आणि तज्ज्ञ मंडळी यांच्यातली संयुक्त बैठक संध्याकाळी 7च्या सुमाराला संपली. राजापूरच्या तहसील कार्यालयामध्ये ही बैठक झाली. बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनाचा ता चौथा दिवस होता. अजूनही आंदोलक बारसुच्या सड्यावर ठाण मांडून बसले आहेत.
एकीकडे बारसूतल्या रिफायनरीला होणारा विरोध शमवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे स्थानिकांनी आज महमोर्चाची हाक दिली आहे. स्थानिकांच्या या मोर्चाला ठाकरे गटानं पाठिंबा दिला आ हे. आज सकाळी 10 वाजता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत या महामोर्चात सहभागी होणार आहेत.
बारसूच्या सड्यावर सलग तिसऱ्या दिवशी बोरिंग मारण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. सड्यावर माती परिक्षणासाठी लागणाऱ्या बोरिंग मारल्या गेल्या. तर बोरिंग मारायचं काम लवकर संपवायचे आदेश जिल्हा प्रशासनानं एमआयडीसीला दिलेत. यामुळे या कामाला वेग आला असून, आतापर्यंत तीन बोर मारुन झाल्या आहेत.