Beed Crime: `त्या` 109 मृतदेहांबद्दल बीड पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण
Parli Crime: या 109 जणांचा आकस्मात मृत्यूचं झाल्याचे बीड पोलिसांनी म्हटले आहे.
Parli Crime: परळी शहर आणि तालुक्यांमध्ये तब्बल 109 मृतदेह आढळल्याच्या बातमीने वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या. यावर बीड पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. या 109 मृतदेहाचा आकस्मात मृत्यूचं झाला आहे. यामध्ये कुठलाही खून, हत्या नाही. पाण्यात बुडून मृत्यू, सर्पदंश, आत्महत्या यासारख्या गुन्ह्याची नोंद ही आकस्मात मृत्यू म्हणून होत असते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काही प्रसारमाध्यमांनी गैरसमज पसरवला आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रसार माध्यमांकडून ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका, बीड पोलीस आपल्या पाठीशी उभा आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर ज्यांनी कोणी या अफवा पसरवल्या आहेत, त्यांचीदेखील चौकशी करणार असून त्यांना देखील नोटीस बजावणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले आहे.
काय होत्या चर्चा?
गेल्या वर्षभरात परळी तालुक्यात तब्बल 109 मृतदेह पोलिसांना आढळून आलेत. या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे. यात काहींचे आत्महत्या काहींचे बेवारस मृतदेह, तर काहींचे अपघातात मृत्यू झालेल्यांचा समावेश असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाही. तर, परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले त्यातील 21 मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर 4 मृत देहाची ओळख पटली नाही, तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दर 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येताय. पण आता बीड पोलिसांनी या चर्चांवरुन पडदा उघडला आहे. आकस्मात मृत्यू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.