मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला...
Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड शहरामध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करुन संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं 'झी 24 तास'शी बोलताना सांगितलं. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.
राजकीय ड्रामा
बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी, "सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरु झालेला आहे. संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत. ते आपआपल्या क्षेत्रात तिचं काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हस्यास्पद आहे. आम्ही हातभर चांगली माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत," असं सांगितलं.
फरार आरोपींचा मार्डर?
पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील तिन्ही फरार आरोपींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे. "बाकी आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. पण एक धक्कादायक बातमी मला सांगायची आहे. काल रात्री जवळपास साडेअकराच्या आसपास मला फोन आले आणि त्यात असं सांगण्यात आलं की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून इतकं हदरायला झालं की मी ताबडतोब पोलीस निरिक्षकांना फोन करुन याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील. हे किती खरं किती खोटं मला ठाऊक नाही. पण असं झालं असेल तर हे अतिशय भयानक आहे," असं अंजली दमानिया म्हणाल्या.
नक्की वाचा >> Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
मर्डरसंदर्भात पोलीस काय म्हणाले?
वाल्मिक कराडलाच वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला असेल? असं विचारलं असताना अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडही आहे की नाही ठाऊक नसल्याचं विधान केलं. "आता वाल्मिक कराड देखील आहे की नाही काय माहिती? कोण काय कोणाला मारतंय काय चाललंय काहीच कळत नाहीये. मी पोलीस निरिक्षकांना ही माहिती दिली तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले यावर कन्फॉर्मेशन आलेलं नाही असं ते म्हणाले. मात्र असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणून काहीच कळत नाहीये," असंही दमानियांनी म्हटलं.
नक्की वाचा >> संतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, 'खरे गुन्हेगार...'
कुटुंबियांचं भावनिक आवाहन
सर्व पक्षीय मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोगमधून बीड शहराकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांची मुलगी, पत्नी, भाऊ व बहीण मोर्चासाठी निघाले आहेत. संतोष देशमुख यांच्या आईची तब्येत खालवली असल्यामुळे त्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. मस्साजोगचे गावकरी देखील संतोष यांच्या कुटुंबीयांबरोबर बीडकडे रवाना झाले आहेत. मोर्चाला निघताना देशमुख कुटुंबीय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. न्यायासाठी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीचे केलं आहे. तर माझा एक भाऊ मी गमावला असला तरी माझे हजारो भाऊ मला न्याय मिळवून देतील असं म्हणताना संतोष देशमुख यांची बहीण भावूक झाली. मसाजोग गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.