संतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, 'खरे गुन्हेगार...'

Beed Protest Morcha: बीडमध्ये आज संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 28, 2024, 08:14 AM IST
संतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, 'खरे गुन्हेगार...' title=
राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी साधला संवाद

Beed Protest Morcha: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिलेली असताना बीड शहराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. या मोर्चाला अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे. बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे.

सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडितांबरोबर तसेच जिल्ह्यातील माजी आमदार आणि माजी मंत्री यांची उपस्थिती या मोर्चामध्ये असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊतही या मोर्चाला हजेरी लावणार आहे. बीडला रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला.

"...अशी लोकांची भावना आहे"

"बीड मधल्या मोर्चात केवळ राष्ट्रीय पक्षाचे नाही तर सर्वच पक्षाचे लोक सहभागी होत आहेत. बीडमधील जनता बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा काढत आहे. सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे," अशी भावना जनतेमध्ये आहे, असं राऊत म्हणालेत. "खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत अशी लोकांची भावना आहे," असं विधान राऊतांनी केलं. तसेच "या मोर्चामध्ये अनेक मोठे नेते सहभागी होतील. शिवसेनेतर्फे आमचे सगळे प्रमुख नेते मोर्चाला उपस्थित आहेत. संभाजीनगरचे नेतेही सहभागी होणार आहेत," असं राऊतांनी सांगितलं. तसेच राऊत यांनी, "जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील," असंही सांगितलं आहे. 

भाजपाचा अ‍ॅक्शन मोड म्हणजे...

भाजप मुंबईमधील महानगरपालिका निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन मोड आल्याचा उल्लेख करत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये म्हणजे काय? ईव्हीएम ताब्यात घेणं, पैसे जमा करणे, पैसे कुठे वाटत आहे ते पाहणं हे त्यांचं अ‍ॅक्शन मोड असते," असा टोला लगावला. "आम्ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील आमची ताकद कार्यकर्ता आहे," असं राऊत म्हणाले. "कार्यकर्त्यांना विकत घेणारी नवी जमात जर राजकारणात महाराष्ट्रात वाढत असेल याच्यात नुकसान आपल्या महाराष्ट्राचं आहे. असं होत असेल तर हे संपूर्ण आपल्या मराठी अस्मितेसाठी चांगलं नाही," असं राऊत म्हणाले.