बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pamkaja Munde) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलंय.  अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवा असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांकडे लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल असेही ते पुढे म्हणाले. 



बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं असा टोला त्यांनी लगावला. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो असा चिमटा त्यांनी ट्विटरवरुन काढला.


जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 आणि कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.



जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेल अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी चिमटा काढला. राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको असे आवाहन त्यांनी पंकजा मुंडे यांना केले.


काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?



#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीय अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती.