चेतन कोळस, झी मीडिया, येवला : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य माणिकराव शिंदे यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. भुजबळांच्या विरोधात ऐन निवडणुकीच्या तोंडावर येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. मात्र शिंदे यांच्या या निर्णयाने कुठलाही फरक पडणार नसून छगन भुजबळ एक लाख मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत भर पडली आहे. येवला-लासलगावमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले त्यांचे निकटवर्ती माणिकराव शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा जाहीर करून त्यांनी भुजबळांना धक्का दिला. विशेष म्हणजे भुजबळांना येवल्यात आणण्याची कल्पना माणिकरावांचीच होती. २००४मध्ये तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी भुजबळांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह शरद पवारांकडे धरला. मात्र आता माझगावातून आलेल्या भुजबळांना परत पाठवण्याची वेळ आल्याचं त्यांनी जाहीर केलंय... 


माणिकरावांनी पाठिंबा काढून घेतला असला तरी आपण १ लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येऊ, असा दावा भुजबळांनी केलाय. तर संभाजी पवारांनाही विजयाची खात्री आहे.


तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या भुजबळांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. अशात त्यांचे मोहरे साथ सोडून जात असताना ही लढाई आता अधिकच बिकट बनली आहे.