`नाहीतर तीस वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही...` भाजपा नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : देशात गाजलेल्या हिजाबबंदीवर निकाल देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही असं म्हटलं होतं. पण यानंतरही हिजाबबंदीचा वाद थांबलेला नाही.
यावर आता राजकीय प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. भाजपा नेते अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान केलं आहे. परिस्थितीच अशी आहे तुम्ही जर असंच हातावर हात देऊन उभे राहले तर तीस वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाने हिजाब घालावा लागेल असं वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडें यांनी केलं आहे. ते मोर्शी मध्ये बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली. पण जिथे शिवाजी महाराज नव्हते, तिथे मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली. अयोध्या, मथुरा आणि काशी विश्वनाथ इथं चित्र वेगळे आहे. कारण तिथे शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली असही बोंडें म्हणाले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या ताकतीने करावा.अस आवाहनही त्यांनी केलं
शिवसेना ही शरद पवारांची बी टीम
हिंदू शिवसेनेची साथ सोडते आहे म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. शिवसेना ही आता शरद पवार यांची बी टीम म्हणून काम करत आहे अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांचे विचार उद्धव ठाकरे यांना पटतात, म्हणून शिवसेनेसोबत एम आय एम युतीची चर्चा सुरू झाली आहे. 'आम्ही शरद पवारांचे चमचे असल्याचं स्वःत संजय राऊत म्हणतात', अशी बोचरी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे