जळगाव : नाराज भाजप नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत विरोधकांवर कारवाई होते की नाही ते पाहणार आहेत. त्यानंतरच खडसे पुढची भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे भाजपकडून खडसे यांना दिलेले आश्वासन पाळण्यात येणार का, याचीही उत्सुकता लागली आहे. जर खडसेंना पक्षात ठेवायचे असेल तर भाजपला (BJP )योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. पुन्हा भाजपने दिरंगाई केली किंवा कारवाईला उशीर केला तर खडसे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तूर्तास तरी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्याआधी त्यांनी माझा मार्ग वेगळा असेल असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी भाजपकडून धावाधाव करावी लागली होती. खडसे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न झाले होते. आता खडसे हे भाजपच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.


भाजप पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर पक्ष काय कारवाई करतो हे खडसे पाहणार आहेत, त्यानंतर भूमिका ठरवणार असल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले आहे. खडसेंनी भाजपला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिल्याच्या बातम्या बिनबुडाच्या असल्याचंही खडसेंनी सांगितले आहे. त्यामुळे खडसे आता किती दिवस वाट पाहणार आणि काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.