Kasba By-Election: कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या (Kasba Election) निमित्ताने भाजपा खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udyanraje Bhosle) यांनी मंगळवारी रॅली काढली. यावेळी त्यांनी हेमंत रासने (Hemant Rasne) विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Ajit Pawar) यांना लक्ष्य करत ते मोठे माणूस असल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य करणं टाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. त्याबद्दल त्यांना आदरांजली असून ताईंचं राहिलेल काम हेमंत रासने हे करणार आहेत. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदारराजाकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता त्यांचा विजय निश्चित आहे," असं उदयनराजे म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कसबा मतदारसंघात भाजपाकडून कोणताही नेता आला तरी रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे असं म्हटलं आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, "सर्व नेतेमंडळी हेमंत रासने यांच्या प्रेमापोटी येत आहेत. तसंच निवडणुका आल्या की, प्रत्येकजण आपापली बाजू मांडत असतो. तसंच त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, पण आजपर्यंत कामं का झाली नाही. कोणाला निवडून आणायचं हे लोक ठरवतील. पण कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडून येणार आहेत". 


"अजित पवार मोठा माणूस आहे. मला तर भविष्य काही सांगता येत नाही. मी वर्तमानात राहतो. तसेच त्यांना भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल तर मला त्यावर काही बोलायचं नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली. 


श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रारकेली आहे. त्यावर उदयनराजे यांनी, मग चांगलं आहे असं सांगत जास्त भाष्य करणं टाळलं.