भाजपची पुढची बैठक थेट लोकसभेच्या विजयानंतरच; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा
भाजप लाचारी पत्कारणार नाही.
जालना: भाजपची पुढची बैठक आता थेट लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्षाची आक्रमक रणनीती स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी पडद्यामागे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शिवसेनेने जास्त जागांची मागणी करुन हा प्रस्ताव अडवून ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ते जालना येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ही भाजपची निवडणुकीपूर्वीची शेवटची बैठक आहे. यानंतरची बैठक थेट लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच होईल. आम्हाला देशाच्या कल्याणासाठी युती करायची आहे. मात्र, त्यासाठी भाजप लाचारी पत्कारणार नाही. ज्यांना हिंदुत्त्ववाद हवा आहे, ते आमच्यासोबत येतील. ज्यांना हिंदुत्त्व नको असेल ते दूर जातील. जे सोबत असतील त्यांच्या साथीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. आता विजय हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेनाच मोठा भाऊ, सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु- संजय राऊत
त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कायमच मोठा भाऊ राहील. हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल. मात्र, भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास शिवसेना युतीसंदर्भात नक्की विचार करेल. शिवसेना त्यावर सकारात्मक विचारही करेल. येत्या आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.