झुडुपांत टाकलेल्या मुलीची जबाबदारी घेणारा `पालक`मंत्री
यामध्ये त्यांना साथ मिळाली ती म्हणजे....
मुंबई : स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वांनीच कितीही प्रयत्न केले असते तरीही हे विदारक चित्र काही केल्या बदलण्याचं नाव घेत नाही आहे. 'पहिली बेटी धनाची पेटी' किंवा 'मुलगी शिकली प्रगती झाली' ही वाक्य आचरणात आणली जात नसल्याचं दाहक वास्तव आजही पाहायला मिळत आहे. पण, या परिस्थितीतही काही व्यक्ती मात्र याच समाजापुढे आपल्या वर्तणुकीतून आणि भूमिकांतून आदर्श प्रस्थापित करत आहेत.
अशाच काही व्यक्ती म्हणजे सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे. 'बीड जिल्हा राष्ट्रवादी'च्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्याच्या सामाजिक न्यायमंत्रीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून एक मंत्री आणि एक व्यक्ती म्हणून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. रेल्वे रुळाजवळील काटेरी झुडुपांमध्ये एका नवजात बालिकेला टाकून कोणीतरी पळ काढल्याची घटना घडली. याविषयीचीच माहिती जेव्हा धनंजय मुंडे यांना मिळाली, तेव्हा त्यांनी क्षणार्धातच या मुलीचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबाला नकोशा झालेल्या याच मुलीच्या उपचारांपासून तिच्या शिक्षणापर्यंतची आणि लग्नाचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वत:च्या खांद्यांवर घेतली. यामध्ये त्यांना साथ मिळत आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे यांची.
सध्याच्या घडीला रेल्वे रुळापाशी सापडलेल्या या मुलीवर उपचार सुरु आहेत. मुख्य म्हणजे या मुलीची जबाबदारी घेणाऱ्या धनंजय मुंडे यांनी तिला 'शिवकन्या' असं नाव देत एक नवी ओळखही दिली आहे.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयाची सर्व स्तरातून प्रशंसा होत असतानाच मुंडे यांनीही सर्वांचे आभार मानले. 'सुप्रियाताई सुळे आणि मी फक्त आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. मुळात झालेला प्रकार संतापजनक आहे, नुकताच जन्म झालेल्या बाळाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना कठोर शासन होईल. यापुढे अशा घटना होणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू. #शिवकन्या रुपी लक्ष्मीचा सांभाळ आपण सारे मिळून करू. #बेटीबचाव', असं ट्विट त्यांनी केलं. सध्याच्या घडीला शिवकन्याची काळजी घेतली जात असून, सर्वजण तिची काळजी घेत असल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं. बाळ शिवकन्या औक्षवंत हो! असा आशीर्वादही या मोठ्या मनाच्या नेत्याने तिला दिला.