मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत ओमराजेसह पाच जणांची नावं लिहली होती. पोलिसांनी तब्बल पाच महिने तपास केल्यानंतर ओमराजेंसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. ओमराजेंवर शेतकऱ्यानं फसवणुकीचा आरोप केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तेरणा कारखान्याने दिलीप ढवळे यांची जमीन कर्जापोटी वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. पण  कारखान्याने कर्ज न भरल्यामुळे ढवळे यांची जमीन बँकेने लिलावात काढली. यामुळे ढवळे यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली.


ऐन निवडणुकीच्या कालावधीत हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दिलीप ढवळे यांनी 2010 साली तेरणा सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांच्या सांगण्यावरून आपली शेतजमीन वसंतदादा बँकेत गहाण ठेवली होती. 


बँकेकडून घेतलेले कर्ज व्याजासकट कारखाना फेडेन, अशी हमी निंबाळकर यांनी दिली होती. मात्र त्यानंतर कारखान्याने पैसे न भरल्याने जमिनीचा तीन वेळेस लिलाव पुकारण्यात आल्याने आपली मानहानी झाली आहे, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचं ढवळे यांनी आपल्या चिठ्ठीत लिहलं होतं. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही नावाचा उल्लेख चिठ्ठीत होता.


याप्रकरणी ढवळे यांच्या पुतण्याने गुन्हा नोंद करण्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच महिन्याच्या तपासनंतर खासदार ओमराजे निंबाळकर, ओमराजे निंबाळकर यांच्या आई आणि तेरणा सहकारी कारखाना ढोकीच्या तत्कालीन चेअरमन आनंदीदेवी पवनराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक, रमाकांत टेकाळे, शाहूराजे धाबेकर, शेषेराव चालक यांच्यासह तेरणा कारखाना, जयलक्ष्मी शुगर आणि वसंतदादा बँकेचे सर्व संचालक अशे 55 लोकांवर कलम 306, 406,409,420,120ब आणि 34 याप्रमाणे ढोकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणात 5 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांचे या प्रकरणात नाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली, अशी चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू आहे.