आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur News) उत्पादन शुल्क कार्यालयातून (Excise Offices) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्पादन शुल्क कार्यालयात बनावट देशी दारू कारखाना (Fake country liquor) प्रकरणातील फरार आरोपी अचानक प्रकट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र फरार आरोपी विष पिऊन (poisson) आल्याचे समजताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आरोपीची अवस्था बघताच कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु असून अशा अवस्थेत त्याने कार्यालया गाठल्याने अधिकारी देखील बुचकळ्यात पडले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट देशी दारू कारखाना  प्रकरणात 3 आरोपींचा शोध सुरू होता. यातील फरार आरोपी राजू  मडावी स्वतः विष पिऊन कार्यालयात पोचल्याने तपास अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी 2 वर्षांपूर्वी उठवण्यात आली होती. त्यानंतर विविध माध्यमातून बनावट दारूचा पुरवठा वाढला होता. त्यातच 25 जानेवारी रोजी मूल तालुक्यातील चितेगाव शेतशिवारात असलेल्या एका शेळीपालन केंद्रात बनावट कारखाना सुरू होता. उत्पादन शुल्क विभागाने यावर धाड घातली आणि गुरू संग्रामे (पोलिस पाटील) आणि उमाजी झाडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तीन आरोपी अद्याप फरार होते. त्यांना शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा काम करत होती. मात्र अचानक राजू मडावी याने असा पवित्रा घेतल्याने अधिकारी देखील चक्रावले आहेत.


गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास फरार असलेला राजू मडावी (26) हा उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन उत्पादन शुक्ल कार्यालयात पोहोचला होता. उत्पादन शुक्ल कार्यालयातच मडावी याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. गेल्या 15 दिवसांपासून मढावी हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी उप्तादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. त्यानंतर गुरुवारी अचानक मडावी कार्यालयात पोहोचला. दुसरीकडे राजू मडावी हा शरण जाण्याच्या उद्देशाने कार्यालयात गेला होता असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.


दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात फरार आरोपींना जामीन मिळत नसल्याने मडावी याने जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे त्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मडावी याने कार्यालयात उंदीर मारण्याचे विष प्यायले नाही तर तो बाहेरच कुठेतरी विष प्राशन करून आला, असेही अधिकारी म्हणाले.