शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता थेट उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये बुधवारी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा शिल्पकार व मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात आहे. जयदीप आपटे सध्या सावंतवाडी येथील उपजिल्हा कारागृहात आहे. आता याच प्रकरणात पोलिसांना तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे.
तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश
पुतळा कोसळ्याप्रकरणी गुरुवारी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून या आरोपीचे नाव परमेश्वर यादव असं आहे. परमेश्वर यादव हा पेशाने वेल्डर असून त्यानेच या दुर्घटनाग्रस्त पुतळ्याचं वेल्डिंग केलं होतं. मात्र पुतळ्याचं वेल्डींग करताना काही भागांचे वेल्डिंग त्याने व्यवस्थित केलं नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. पुतळा कोसळल्यानंतर ज्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला त्यामध्ये मूर्तीकार, बांधकाम सल्लागाराबरोबरच वेल्डिंग करणाऱ्याचाही समावेश होता. जवळ पास दीड महिन्यांनंतर वेल्डिंगचं काम करणाऱ्या परमेश्वर यादवला पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथून अटक केली आहे. न्यायलयाने परमेश्वर यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरा आरोपी कोण?
26 ऑगस्ट रोजी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
अन्य दोन आरोपींची भूमिका काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर पुतळा घडविणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि सदर काम देण्यात आलेला कंत्राटदार चेतन पाटील यांना अटक करण्यात आली. जयदीप आपटेने 28 फुटांच्या प्रत्यक्ष पुतळ्याचे काम केले होते. तर चेतन पाटीलने चौथरा आणि आजूबाजूच्या भागाचे सुशोभिकरणाचे काम केले होते. या पुतळ्याचं वेल्डिंग करणाऱ्यालाही आता अटक करण्यात आली आहे.
पुतळा कोसळण्याची कारणं काय?
राज्य सरकाने शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने आपला 16 पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला. यात 33 फुटांच्या पुतळ्याचा भार पेलू शकेल इतकी पुतळ्याची बांधणी मजबूत नव्हती असं म्हटलं आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने केलेले वेल्डिंग आणि गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. तसेच पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे पुतळा कोसळला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.