चिंचवडमध्ये उमेदवार कोण? अश्विनी जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे की शंकर जगताप करणार बंडखोरी?
Chinchwad Assembley Election: चिंचवडमध्ये नेमका उमेदवार कोण.?कोण करणार बंडखोरी? जाणून घेऊया
कैलास पुरी, झी २४ तास पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या तीन विधानसभा मतदार संघापैकी चिंचवड विधानसभेकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागलंय. चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला जाणार असा समज आहे. त्यामुळे साहजिकच अश्विनी जगताप या पुन्हा या मतदार संघात इच्छूक आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा उत्तराधिकारी आपणच असल्याचे त्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे त्या निवडणूक लढवणार अशी चर्चा मतदारसंघात आहे. पण दिवंगत आमदारांचे बंधू आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे दिर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केलीय.
पोटनिवडणुकीत शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळणार होती मात्र अश्विनी जगताप यांनी बंडखोरी करत प्रसंगी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी दाखवल्याने अखेर शंकर जगताप यांना थांबावे लागल्याचे शंकर जगताप यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे या वेळी पक्ष त्यांनाच संधी देणार असा दावा शंकर जगताप पाठीराख्यांचा आहे. विधानसभा जागेसाठी घरातच हा संघर्ष सुरु असताना नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी एकत्र येत घरघुती कलह मिटवत अश्विनी जगताप यांना थांबण्यास राजी केल्याची चर्चा आहे. वाद मिटल्याची चर्चा असताना अचानक पणे अश्विनी जगताप २० नगरसेवकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा प्रसार माध्यमांवर सुरु झालीय.
त्यामुळे जगताप कुटुंबियांच्या घरातील वाद खरेच मिटला की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. आणि खरेच वाद मिटला नसेल तर दोघे ही प्रसंगी बंडखोरी करायला मागेपुढे पाहणार नाहीत असा दावा कार्यकर्ते करत आहेत. आणि दोघांपैकी एकानेही बंडखोरी केली तर लढत जगताप विरुद्ध जगताप अशीच होण्याची चिन्हे आहेत. पण जगताप कुटुंबातील बंडखोरी करणार कोण यावर बरेच काही अवलंबून आहे...!
विधानसभा जागेसाठी हा वाद सुरु असल्याची चर्चा असतानाच भाजपच्याच अनेकांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यात चंद्रकांत नखाते आणि शत्रुघन काटे यांचे नाव आघाडीवर आहे. आपल्या प्रभागात ताकतवान असलेल्या या नेत्यांना भाजपच्या चिंचवड मधल्या असलेल्या मतांच्या आधारावर आपण विजय खेचून आणू असा विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने इतर नेते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्या पद्धतीने हे नेते भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाकडून निवडणूक लढतील का याबाबत साशंकता आहे. मात्र जगताप कुटुंबियांना विरोध करण्यासाठी ते किती टोकाची भूमिका घेतात हा ही मतदार संघात चर्चेचा विषय आहे.
भाजपमधून तिकिटासाठी ही साठमारी सुरु असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही अनेकजण इच्छूक झालेत. त्यात भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांचा समावेश आहे. मोरेश्वर भोंडवे आणि भाऊसाहेब भोईर यांचा दावा सध्या तरी म्हणावा तसा प्रभावशाली नाही. मात्र अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेल्या नाना काटे यांनी प्रसंगी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवत आपण निवडणूक लढवणारच असा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी एकसंध असताना नाना काटे यांच्या घरीही भेट दिली. या भेटी दरम्यान नाना काटे यांनी हिंजवडी आय टी पार्क चे जनक शरद पवार अशी जोरदार फ्लेक्सबाजी वाकड, पिंपळे सौदागर परिसरात केली होती. त्यामुळे नाना काटे हे शरद पवार यांना ओळखतात आणि प्रसंगी ते शरद पवार यांच्याशी संपर्क साधत तो पर्याय ही खुला ठेवत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी एकसंध असताना जवळपास 1 लाख मते घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पण ही मते तेंव्हा महायुती विरोधात असलेल्या असंतोषाची होती आता परत ती किमया नाना काटे यांना साधता येईल का हा प्रश्नच आहे. पण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाऊ शकतात याची मात्र जोरदार चर्चा सध्या सुरु आहे...
चिंचवड विधानसभा म्हंटल की गेल्या काही निवडणुकांमध्ये कायम चर्चेत राहिलेले नाव म्हणजे राहुल कलाटे...! २०१९ ला सर्वपक्षीय अपक्ष असलेल्या राहुल कलाटे यांनी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र २०१९ मधल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहिलेल्या कलाटे यांनी जवळपास ४५ हजार मत घेतली. मात्र त्यांच्यामुळे नाना काटे यांचा पराभव झाला ही चर्चा मतदारसंघात सुरु झाली. आणि त्यांच्या विषयी सेट झालेले हे नेरेटिव्ह त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. कलाटे अजून ही कोणतीही थेट भूमिका घेत नसल्यामुळे उलट सुलट चर्चा आहे. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे त्यांच्यासाठी खूप आग्रही आहेत आणि राहुल कलाटे यांची शरद पवार गटाच्या प्रवेशाची सगळी मदार कोल्हे यांच्यावर आहे. दोन वेळा अपक्ष लढून पराभव पत्करलेले राहुल कलाटे यावेळी अपक्ष लढण्याच्या मानसिकतेत नाहीत.त्यामुळे ते नेमकी भूमिका काय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच काय तर सध्या चिंचवड मध्ये उमेदवार कोण, कोणत्या पक्षात कोण असणार याची निश्चित गणिते मांडता येत नसली तरी जगताप कुटुंबात बंडखोरी झाली तर लढाई जगताप विरुद्ध जगताप अशीच होणार अशी चिन्हे अधिक आहेत...!