रत्नागिरी : Chiplun Flood : चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे. कारण पुराबाबत चिपळूण पालिका (Chiplun Municipal) आता महसूल (Revenue Department), पाटबंधारे ( Irrigation Department) आणि हवामान विभागाविरोधात (Meteorology Department)न्यायलायत जाणार आहे. जुलै महिन्यात अति मुसळधार पावसाने कोकणला जोरदार दणका दिला. महाड आणि चिपळुणात महापुराचे पाणी शहरात घुसले आणि मोठे नुकसान झाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिपळूणमधील पुराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शहरातील पूरस्थितीबाबत चिपळूण पालिका न्यायालयात जाणार आहे. पाटबंधारे खाते आणि हवामान विभागाविरोधात पालिका दावा ठोकणार आहे. याबाबतचा निर्णय चिपळूण पालिकेच्या सभेत घेण्यात आला आहे.


चिपळूण पालिकेच्या कालच्या सभेत शहरातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पाटबंधारे खातं आणि हवामान विभागाविरोधात दावा करण्याबाबत निर्णय झाला. चिपळूण पुराला हेच जबाबदार धरत न्यायालयात जाण्याचा निर्णय करण्यात आला आहे. दरम्यान, या संबंधित विभागाना तीन नोटीस देण्यात येणार आहेत.  त्यांच्याकडून काय उत्तर दिले जाते, यावर पुढील घडामोडी घडणार आहेत. 


चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 ऑगस्टरोजी झालेल्या सभेत याबाबतचा निर्णय झाल्याचे चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत तिन्ही विभाग काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.