`9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,` नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, `काही दिवसांपासूर्वी...`
नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आपल्या बंगल्यात एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या बंगल्यात एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 9 कोटींसाठी तरुणाला डांबून ठेवलं असून त्याच्यावर अत्याचार सुरु असल्याचा नाना पटोलेंचा दावा आहे. दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी या आरोपाला उत्तर दिलं आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
"माजी मंत्री आणि आता आमदार असणारे रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या एका तरुणाला किडनॅप करुन ठेवण्यात आलं आहे. त्याच्याकडून 9 कोटी रुपये गायब झाले आहेत. त्याच्याकडे 9 कोटी कुठून आले ते मला माहिती नाही. त्याच्याकडून 4.5 कोटी वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित 4.5 कोटी मिळाले नसल्याने त्याच्यावर अत्याचार सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे," असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांनी अधिक माहिती विचारली असता त्यांनी तुम्हीच शोधून काढा असं सांगितलं.
रवींद्र चव्हाण यांचं उत्तर
नाना पटोले यांच्या आरोपाला रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोलेंनी टीआरपीसाठी हे विधान केल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. "नाना पटोले हे नेहमीच टीआरपीसाठी अशी विधानं करत असतात. त्यातूनच त्यांनी हे विधान केलं आहे. काही दिवसांपासून वर्तमानपत्र व मीडियात भाजपामध्ये मला प्रमुख पद मिळणार आहे, हे माहिती पडलं तेव्हापासून विरोधकांकडून अशा चर्चा घडवल्या जात आहेत," असं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.