नितेश महाजन, झी २४ तास, जालना : शिवसेनेचा नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनीही बंडाचा इशारा दिलाय. त्यामुळे, खातेवाटपाआधीच महाविकास आघाडीतली बिघाडी समोर आलीय. मंत्रीपद न मिळाल्यानं कैलास गोरंटयाल नाराज झालेत. गोरंटयाल जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. थोड्याच वेळात गोरंट्याल समर्थकांची जालन्यात बैठक होणार आहे. कैलास गोरंटयाल समर्थकांसह राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. गोरंटयाल यांच्या बैठकीतील निर्णयाकडे लक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, शिवसेनेत आज औरंगाबाद आणि मुंबईत बैठकांचं सत्र सुरू आहे. एकीकडे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी औरंगाबादमध्ये बैठक सुरू आहे. अर्जुन खोतकर, अंबादास दानवे आणि सांदिपान भुमरे हे त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉटेल अतिथी इथे सत्तार यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर मुंबईत उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी मातोश्रीवर सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांसह खलबतं सुरू आहेत. एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे सेना नेते मातोश्रीवर दाखल झालेत.  


तर, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. सत्तारांच्या राजीनाम्यानं महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय तर सत्तारांचं राजीनामनाट्य या सरकारचं खरं रूप दर्शविणारं असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.