पुणे : सर्वशिक्षा अभियानातील पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल करण्यात आलेला आक्षेपार्ह उल्लेखावरून वाद पेटलाय. विरोधकांनी सरकारवर टीका करत माफीची मागणी केलीय. सभांजी महाराजांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारा उल्लेख आहे.  सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असं एक वाक्य वापरण्यात आलंय. या वाक्यावरूनच हा वाद सुरू झाला. 


'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तकातील वादग्रस्त मजकूर 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सरकारनं हे पुस्तक तातडीने मागे घेऊन संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय... तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत पुण्यातल्या शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केलं.


डॉ. शुभा साठे या पुस्तकाच्या लेखिका आहेत. या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. असा वादग्रस्त मजकूर  'शालेय पुस्तकात छापलाच कसा जातो' असा प्रश्न विचारत संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारवरही टीका केलीय.