-चेतन कोळस, येवला (नाशिक)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात एकीकडे टोमॅटोच्या दराने लोकांना धडकी भरवली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये टोमॅटोने 200 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. इतर भाज्याही चांगल्याच महाग झाल्या आहेत. मात्र भाज्या महाग झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. टोमॅटो उत्पादक जिल्हा असलेल्या जुन्नरमध्ये तब्बल एक डझन शेतकरी कोट्यधीश झाले आहेत. एकीकडे टोमॅटोला सुगीचे दिवस आलेले असतानाच दुसरीकडे कोथिंबीरीला सोन्याचा भाव मिळत असल्याचं दिसत आहे. नाशिकमधील एक शेतकरीही लखपती झाला आहे.


तो निर्णय पथ्यावर पडला


निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातील तारुखेडले येथील शेतकऱ्याच्या मेहनतीला 'अच्छे दिन' आले आहेत. 6 एकरांमध्ये कोथिंबीरीचा तब्बल 12 लाख 51 हजारांमध्ये सौदा झाला आहे. येथील युवराज एकनाथ जगताप यांच्या शेतातील कोथिंबीर शेतकऱ्याने जागेवर म्हणजेच शेतातूनच उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप हे मागील अनेक वर्षांपासून कोथिंबीरीची शेती करतात. मात्र अनेकदा जगताप यांना हवामानाचा फटका बसला. कधी उन्हामुळे तर कधी पावसामुळे पीक वाया गेलं. विपरीत परिस्थितीने नेहमीच जगताप यांच्या पिकाला फटका बसत आला. मात्र जगताप यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा 6 एकरामध्ये कोथिंबीर लावण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय आज जगताप यांना लखपती बनवण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.


जागेवर झाला सौदा


जगताप यांनी फार कष्टाने, मेहनतीने 45 दिवस कोथिंबीरीची काळजी घेतली. त्यांच्या मेहनतीला नशिबाने साथ दिली आणि कोथिंबीरीच्या दराला उचल मिळाली. नाशिकमधील व्यापारी सुनील ढेंबरे यांनी तारुखेडले येथे युवराज यांच्या शेतात जाऊन माल पाहिला. ढेंबरे यांना हा माल इतका दर्जेदार वाटला की त्यांनी शेतात लगेचच सौदा निश्चित केला. ढेंबरे यांनी तब्बल 12 लाख 51 हजार रुपयांना सर्व कोथिंबीर विकत घेण्याचं ठरवलं आणि ही डील शेतातच फायनल झाली. आपल्या कोथिंबीरीला लाखो रुपये मिळाल्याने मागील अनेक वर्षांपासून सातत्याने घेत असलेल्या कष्टाचं चीज झाल्याच्या भावना जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.


 


नक्की वाचा >> महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट


 


यापूर्वी एकरी 2 लाख भाव मिळाला


निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील उंबरखेड येथील राजेंद्र निरगुडे या शेतकऱ्याच्या कोथिंबीरीला काही दिवसांपूर्वीच एकरी 2 लाख रुपयांचा दर मिळाला होता. मजुरी आणि पावसाचा अंदाज पाहून या शेतकऱ्यांने व्यापाऱ्याला जागेवरच कोथिंबीर देऊन टाकल्याने व्यापाऱ्याने एकरी 2 लाख रुपये या शेतकऱ्याला दर दिला आहे.