महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट

Pune Farmer Earns Rs 2.8 Cr From Tomatoes: "हे यश आम्हाला एका दिवसात मिळालेल नाही," असं या शेतकऱ्याने त्याच्या कुटुंबाला सध्या टोमॅटोच्या दरवाढीच्या लाटेत मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना सांगितलं. आपण लाखो रुपयांचं नुकसान यापूर्वी सोसल्याचंही त्याने सांगितलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 17, 2023, 11:16 AM IST
महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट title=
36 वर्षीय ईश्वर गायकर हे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात

Pune Farmer Earns Rs 2.8 Cr From Tomatoes: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये टोमॅटोचा दराने 200 चा टप्पा ओलांडला आहे. देशातील अनेक शहरांमध्येच हीच परिस्थिती असताना या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचं दिसत आहे. पुण्यामधील एका शेतकऱ्याने तर टोमॅटोची विक्री करुन तब्बल 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे ईश्वर गायकर. खरं तर 36 वर्षीय ईश्वर गायकर यांचे वडील तुकाराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली टोमॅटोची शेती करतात. तुकाराम गायकर यांच्या मालकीची 18 एकरची शेती आहे. त्यापैकी 12 एकरावर सध्या टोमॅटोचं पीक असून सध्याच्या दरवाढीमुळे गायकर कुटुंबाचं टोमॅटोचं पिक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरत आहे.

3 कोटी 50 लाखांपर्यंत कमाई करणार

गायकर कुटुंब हे मुळचं पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाचघर गावचं आहे. जुन्नर जिल्ह्याची ओळख सर्वाधिक धरणांचा जिल्हा अशी केली जाते. याच 12 महिने पाण्याचा फायदा इतर गावांप्रमाणे पाचघरलाही होतो. सुपीक जमीन आणि 12 महिने पाण्याच्या जोरावर येथे बागायती शेती केली जाते. ज्यात प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटोचं पीक घेतलं जातं. गायकर यांचा मुलगा ईश्वर आणि सून सोनाली हे शेतीत त्यांना मदत करतात. या टोमॅटो शेतीमधून त्यांनी यंदाच्या सिझनमध्ये आता 2 कोटी 80 लाख रुपये कमवले आहेत. विशेष म्हणून गायकर कुटुंबाकडे अजून 4000 कॅरेट टोमॅटो उपलब्ध असून सिझन संपेपर्यंत गायकर कुटुंब 3 कोटी 50 लाख रुपयांपर्यंत करेल असं सांगितलं जात आहे. 

एका दिवसात मिळालेलं यश नाही

अनेकांना सध्या गायकर कुटुंबाकडे येणारा पैसा दिसत असला तरी यामागे बरेच कष्ट आहेत. या कष्टासंदर्भात बोलताना ईश्वर गायकर यांनी, "हे आम्हाला एका दिवसात हे यश मिळालेल नाही. मागील 6 ते 7 वर्षांपासून आम्ही 12 एकरावर टोमॅटोचं पीक घेत आहोत. अनेकदा आम्हाला यामध्ये तोटाही सहन करावा लागला पण आम्ही आशा सोडली नाही. 2021 मध्ये आम्हाला 18 ते 20 लाखांचा तोटा झाला होता. मात्र आम्ही मागे हटलो नाही," अशी प्रतिक्रिया एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नोंदवली. 11 जुलैला गायकर कुटुंबाने 900 कॅरेटची विक्री केली. त्यामुळे या कुटुंबाला त्या दिवशी तब्बल 18 लाख रुपये मिळाले.

अजूनही 3 ते 4 हजार कॅरेट टोमॅटो

यंदाच्या वर्षी मिळत असलेल्या दराबद्दल बोलताना ईश्वर यांनी, "यावर्षीही आम्ही 12 एकरांवर टोमॅटोचं पीक घेतलं आहे. आतापर्यंत आम्ही 17 हजार कॅरेटची विक्री केली आहे. या कॅरेटसाठी आम्हाला सरासरी 770 ते 2311 रुपये प्रती कॅरेटदरम्यान दर मिळाला आहे. आतापर्यंत आम्ही यामधून 2.8 कोटी रुपये कमवले आहेत," असं सांगितलं. तसेच, "आमच्याकडे अजूनही 3 ते 4 हजार कॅरेट टोमॅटो आहेत. याचा हिशेब लावला तर या वर्षात आमची कमाई 3.5 कोटींपर्यंत जाईल," असंही ईश्वर यांनी स्पष्ट केलं. "माझ्या पालकांचा, आजी-आजोबांचा आशिर्वाद आणि माझ्याबरोबर शेतात कष्ट करणाऱ्या माझ्या पत्नीमुळे हे यश मिळालं आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज समाधानी आहे," असंही ईश्वर यांनी सांगितलं. 

आधी 1 एकरावरच घ्यायचे टोमॅटोचं पीक

यंदा आम्हाला किलोसाठी 30 रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा होती असं ईश्वर यांनी सांगितलं. "हे सिझन सुरु होण्याआधी आम्हाला 30 रुपये प्रती किलो दर मिळेल असं वाटलं होतं. मात्र आम्हाला लॉटरीच लागली," असं ईश्वर म्हणाले. ईश्वर हे 2005 पासून शेती करतात. शेती हा ईश्वर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पूर्वी गायकर कुटुंब केवळ 1 एकरावर टोमॅटोचं पीक घ्यायचं. त्यानंतर मदतीसाठी मजूर उपलब्ध झाल्याने त्यांनी 12 एकरांमध्ये टोमॅटोचं पीक घेण्यास सुरुवात केली. गायकर हे टोमॅटोबरोबरच कांद्याचंही पीक घेतात. तसेच ते सिझननुसार फुलांचंही पीक घेतात.