मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


याआधी २९ मे रोजी एकाच दिवशी ८,३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. १५ जून रोजी ५,०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. त्यानंतर आज ४ हजारपेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आलं. 


राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५, नाशिक मंडळात १३९, औरंगाबाद मंडळ २१,  कोल्हापूर मंडळ २४, लातूर मंडळ ७, अकोला मंडळ २६, नागपूर मंडळ ५९ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.