मुंबई: ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल.  ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दुधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 हजार दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दुधउत्पादकांना याचा फटका बसत आहे. 

या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध विविध संस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे 200 कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दुध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.