कल्याण : कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील कोरोना विषाणूचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसंच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील, याकरता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर या प्रयत्नांना यश आलं आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड१९ टेस्टिंग लॅब कल्याण – डोंबिवली महानगरपालिका आणि क्रशना डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केली जाणार आहे. ही लॅब 'पीपीपी' तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून मंगळवारी या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आढावा घेतला श्रीकांत शिंदे यांनी घेतला. 


दरम्यान, या लॅबमध्ये दररोज ३००० चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (#NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल. 


 


नव्यानं सुरु करण्यात आलेल्या या लॅबमुळं कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे.