ठाणे : महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना छोटीच होती. मात्र, तक्रारदार महिला आणि आरोपी व्यक्ती दोघांनीही मुद्दा ताणल्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. घटना अशी की, तक्रारदार महिला आणि तिचा पती मॉर्निंग वॉक करून परतत होते. जीन्यातून जाताना महिलेचा पाय आरोपीच्या घरासमोर ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्याला लागला आणि कचरा बाहेर पडला. दरम्यान, हा पाय चुकून लागला नसून, महिलेने जाणीवपूर्वक डब्याला लाथ मारल्याचा आरोपीचा गैरसमज झाला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. या वेळी आरोपीने महिलेला उद्देशून 'छम्मक छल्लो' असा शब्द वापरला.


आपल्याला 'छम्मक छल्लो' म्हटले याचा महिलेला तीव्र राग आला. त्यामुळे महिलेने आपल्या सोसायटीकडे तक्रार केली. मात्र, सोसायटीमध्ये हे प्रकरण नेऊन समाधान न झाल्याने या महिलेने तक्रार दाखल केली. काही दिवसातच दंडाधिकाऱ्यांपुढे खटलाही उभा राहिला. दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तीवाद झाले. या वेळी तक्रारदार महिलेने आपल्यावर हेतुपुरस्पर आरोप लावल्याचा आरोप केला. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी तो ग्राह्य धरला नाही.


खटल्यावर निकाल देताना दंडधिकाऱ्यांनी 'छम्मकछल्लो या शब्दाचा अर्थ भारतीय समाजामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हा शब्द महिलांचा अपमान करण्यासाठी वापरण्यात येतो', असे मत व्यक्त करत आरोपीला कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत साधा तुरुंगवास आणि एक रूपयाचा दंड ठोठावला'. शिवाय, आरोपीने महिलेची लेखी माफी मागण्याचेही आदेशही दिले. न्यायालयाच्या आवारात या प्रकरणाची चांगलीच चर्चा होती.